नाशिक – स्थायी समितीने महानगरपालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ३०५४.७० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात कुठलेही बदल अथवा करवाढ न करता सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समितीने आधीच मालमत्ता करात दोन टक्के वाढ, नवीन औद्योगिक मिळकतींच्या मूल्यांकन दरात सुधारणा, भाडेतत्वावरील मिळकतींसाठी नवी कर आकारणी पद्धत आदींचा अंतर्भाव केला आहे. आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा, आरोग्य वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, नदी स्वच्छता आदींवरील खर्चाचा विचार करण्यात आला असून टिकरिंग प्रयोगशाळेच्या माध्यमातून विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहे.

मनपाच्या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये डोळ्यांवरील शस्त्रक्रियेची व्यवस्था, तळघर व धोकादायक ठिकाणांवरील आग विझविण्यासाठी यंत्रमानव, सिटीलिंकच्या ताफ्यात ५० नवीन इलेक्ट्रिक बस, शहरातील रस्त्यांचे सुरक्षा दृष्टीकोनातून तर सर्व पुलांचे संररचनात्मक परीक्षण करण्याची तयारी आदींचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. वाहतूक कोंडींवर अभियांत्रिकी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गणना करून उपाय शोधण्यात येणार आहे.

४०६ कोटींच्या ठेवी मोडणार

आगामी कुंभमेळ्यासाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या आराखड्यात महानगरपालिकेचा हिस्सा आणि या आराखड्यात समाविष्ट नसलेली अन्य कामे याकरिता एकूण ५५० कोटी रुपयांची तरतूद महानगरपालिकेने केली आहे. आगामी आर्थिक वर्षात विविध प्रयोजनांसाठी राखीव ४०६ कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत. यात विशेष राखीव निधीतून २०० कोटी, कर्ज निवारण ३० कोटी, विकास शुल्क निधीतील १३५ कोटींचा समावेश आहे. या ३६५ कोटींपैकी बहुतांश निधी सिंहस्थासह अमृत योजनेंतर्गत कामांसाठी वापरला जाणार आहे.

Story img Loader