नाशिक : शहरात प्रदूषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या १५ इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रांचे काम पूर्णत्वास गेले असून यातील पाच ते सहा केंद्र लवकरच सुरू होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी प्रति युनिट जीएसटीसह १६ रुपये ६० पैसे दर निश्चित करण्यात आला. खासगी केंद्रांच्या तुलनेत हे दर कमी असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. खास ॲप विकसित करून वाहनधारकांना या केंद्रांचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मागील तीन ते चार वर्षात शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण वाढत असल्याने

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत महापालिकेने विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग केंद्र उभारण्याचे निश्चित केले. राजीव गांधी भवन अर्थात मनपा मुख्यालयासह सहाही विभागात त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यातील १५ केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. वाहन चार्जिंगसाठी स्थायी समितीने दर निश्चिती केल्यामुळे केंद्र कार्यान्वित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चून शहरात २० इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी व्यवस्था उभारली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी नऊ केंद्रांना मान्यता देण्यात आली. यातील काहींची अद्याप स्थळ निश्चिती बाकी आहे.

ॲपद्वारे वाहनधारकांना सुविधा

महापालिकेच्यावतीने चार्जिंग केंद्र चालविले जातील. यासाठी वाहनधारकांना ॲपद्वारे ऑनलाईन सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये वाहनधारकांना आपल्याजवळ कुठे चार्जिंग केंद्र आहे, नोंदणी, केंद्राची यादी, चार्जिंगसाठी ठराविक वेळेची निश्चिती, चार्जिंग कसे करता येईल, याची चित्रफितीद्वारे माहिती, सांकेतांक स्कॅन करून पैसे देण्याची व्यवस्था आदींचा समावेश असल्याचे महापालिकेचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी सांगितले. स्थायी समितीे चार्जिंगसाठी प्रतियुनिट १६ रुपये ६० पैसे रुपये दरही निश्चित केला आहे.

केंद्र कुठे ?

इलेक्ट्रिक वाहनांसाठी महानगरपालिका पहिल्या टप्प्यात २० आणि दुसऱ्या टप्प्यात नऊ असे एकूण २९ चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत.. यात राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व सहा विभागीय कार्यालय इमारत, तपोवन बस स्थानकालगत, सातपूर अग्निशमन केंद्र, राजे संभाजी स्टेडिअम, बिटको रुग्णालय, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर शाळेचे मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजीपाला बाजार इमारत, लेखानगर आणि अंबड लिंक रस्त्यावरील मनपाची मोकळी जागा या ठिकाणी ही केंद्र असतील. दुसऱ्या टप्प्यातील नऊपैकी काही केंद्रांची स्थळ निश्चिती अद्याप बाकी असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.