नाशिक : राम काल पथ योजनेसह सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी आणि अन्य भागात अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनु्ष्यबळ नसल्याचे कारण देत महापालिकेने हे कामही आता बाह्य अभियकरणांमार्फत (आऊट सोर्सिंग) करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता १६० जणांचे मनुष्यबळ आणि यंत्र सामग्री पुरवून मोहीम राबविण्यासाठी पुढील तीन वर्षात सुमारे १७ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

अनेक वर्षात भरती झालेली नसल्याने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात मनुष्यबळ तुटवडा भेडसावत आहे. विविध पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातील काळाराम मंदिर परिसर ५०० मीटर, कुंभमेळा अमृत (शाही) मार्ग ३.४ किलोमीटर, साधुग्राम परिसर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. रामकाल पथ योजना आणि सिंहस्थासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणे अत्यावश्यक असल्याने तीन वर्षांसाठी यंत्रसामग्री व मनु्ष्यबळ पुरविण्याच्या प्रस्तावाला अलीकडेच सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

पंचवटी आणि अन्य विभाग यांचा विचार केल्यास अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यासाठी पुढील तीन वर्षात १६ कोटी ८९ लाख ६८ हजार ५२० रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय व धोरणात्मक मान्यता देण्यात आली. लवकरच या कामांच्या निविदा प्रसिद्ध होतील.

दरम्यान, यापूर्वी महापालिकेने अनेक कामे बाह्य अभिकरणांमार्फत करण्यास प्राधान्य दिले आहे. मोहीम राबविण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. बिगारी, पर्यवेक्षक, सहायक अधीक्षक, अधीक्षक आणि सहायक आयुक्त आदी पदे भरण्यासाठी शासनाकडे सादर झालेला प्रस्ताव प्रलंबित आहे.

पंचवटीत ५०, अन्य विभागात ११० कर्मचारी

पंचवटी विभागात बाह्य अभिकरणामार्फत पुढील तीन वर्षात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यासाठी ५० अकुशल कर्मचारी, मालमोटार, पाईप, गॅस कटर, जेसीबी, मोठ्या क्रेन आणि सुरक्षा यंत्रणा पुरविण्यासाठी तीन कोटी ८७ लाख रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले आहे. मनपाच्या अन्य पाच कार्यालयात याच धर्तीवर मोहीम राबविली जाईल. या पाच विभागांसाठी ११० जणांचे मनुष्यबळ आणि विविध यंत्रसामग्री विचारात घेऊन १३ कोटी दोन लाख रुपयांहून अधिकच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.