नाशिक : इंदिरानगर भागातील अनधिकृत बांधकामे, त्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांबाबत तक्रार करूनही कुठलीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपरोक्त ठिकाणांवर धडक देत महानगरपालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बेकायदेशीर बांधकामे उभी राहत असताना अधिकारी काय करत होते, त्याला अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करुन अतिक्रमण निर्मूलन विभागाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असून त्याकडे मनपाकडून दुर्लक्ष होत आहे. इंदिरानगर भागात सायकल मार्गिकेच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले असून यात बेकायदेशीर धंदे होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी आमदार फरांदे यांच्याकडे केल्या होत्या. याबाबत मनपाला तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे फरांदे यांनी संबंधित अनधिकृत बांधकामांवर धडक दिली. यावेळी मनपा अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नगररचना विभागाचे एन. एस. शिरसाठ यांच्यासह इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक रहिवासीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा…नाशिक : ठाकरे गटाच्या शिबिराआधी शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन; युवा सेना मेळावा, स्वच्छता मोहिमेतून सक्रिय

यावेळी फरांदे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ही बांधकामे अकृषक परवाना नसलेल्या जागेवर उभे असल्याचे उघड झाले. मनपा अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीसा दिल्याचे उत्तर दिल्यावर बेकायदेशीर बांधकामांना किती वेळा नोटीस देणार, असा प्रश्न करुन अशा बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची सूचना फरांदे यांनी केली.

‘अन्न व औषध’च्या कामकाजावर नाराजी

परिसरातील हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसताना अन्न व औषध प्रशासनाने त्यांना मान्यता कशी दिली, अशी विचारणा फरांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नरगुडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली. अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करुन नागरिकांच्या जीविताशी खेळ होत असल्याकडे लक्ष वेधले. शेत जमिनीवर व्यावसायिक मीटर कसे दिले, याची महावितरणकडून चौकशी केली जाणार आहे. संबंधित हॉटेलचे वीज मीटर जप्त केले जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करून उपायुक्त नेर यांची खुर्ची जप्त करावी लागेल, असा इशारा फरांदे यांनी दिला, यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे. सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation fails to take action against illegal construction bjp mla demands explanation from officers psg
Show comments