नाशिक – दीपावलीच्या काळात शहर स्वच्छ राखण्यासाठी दोन वेळा साफसफाई करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, या काळात रस्त्यांवरील सर्व पथदीप सुरु राहतील. त्यात कुठलाही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केली. सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत राखण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. या कामात कसूर झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाणार असल्याची तंबी देण्यात आली आहे.
प्रकाशोत्सव साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज होत असताना या काळात महानगरपालिकेने सेवा सुविधा सुरळीत राखण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी मांडली आहे. या विषयावर अलीकडेच झालेल्या विभागप्रमुख, खातेप्रमुखांच्या बैठकीत कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे नियमित कचऱ्याच्या तुलनेत त्याचा ओघही वाढला आहे. या स्थितीत योग्य प्रकारे संकलन न झाल्यास सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन शहरात नियमित साफसफाई व कचरा उचलला जाईल, कुणाची तक्रार येणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. पावसाळा संपुष्टात येऊनही अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. मुख्य चौक आणि बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले.
हेही वाचा >>>नाशिक महानगरपालिका, मऔविमला बाजू मांडण्याचे निर्देश; जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात याचिका
शहरात पाणी पुरवठा सुरळीत राखावा. त्यात कुठलाही खंड पडणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील. विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. सर्व पथदीप सुरू राहतील, याकडे लक्ष देण्यास सांंगण्यात आले आहे.
बाजारपेठांमध्ये पाहणी करा
शहरातील बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वहात आहेत. मुख्य रस्ते, चौक व बाजारपेठांमधील अतिक्रमण हटविण्याचे नियोजन विभागीय कार्यालय स्तरावर करावे. नियमित कारवाई सुरू ठेवावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे. सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी या काळात आपल्या कार्यक्षेत्रात दररोज बाजारपेठा व अन्य गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करावी. जेणेकरून स्वच्छता, पथदीप, पाणी पुरवठा व तत्सम प्रश्न लक्षात येतील, असे निर्देश त्यांनी दिले.