पंचवटीतील औरंगाबाद महामार्गावरील कैलासनगर (हॉटेल मिरची) चौफुली येथे उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार आहे. काही दिवसांपूर्वी या चौकात खासगी प्रवासी बस आणि मालवाहू वाहनाच्या (डंपर) अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. महामार्गावरील अपघाताचे धोके कमी करण्यासाठी उड्डाण पूलाची गरज मनपा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मांडणार आहे.बस अपघातानंतर शहर व जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधून त्यावर तातडीने उपाय करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली होती. याचवेळी रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. बस अपघाताने कुंभमेळ्यात निर्मिलेल्या वळण रस्त्यांनी अनेक चौफुल्यांवर निर्माण झालेल्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या. पंचवटी विभागात आरटीओ सिग्नल ते तारवालानगर चौफुली, मोरे मळा चौफुली आणि कैलासनगर (मिरची ढाबा सिग्नल) सिग्नल चौफुलीवर गतिरोधक टाकण्याची स्थानिकांकडून वारंवार मागणी होत आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याने तिथे गतिरोधक टाकण्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यास मान्यता न मिळाल्याने आजवर रखडलेले विषय त्या बैठकीत मार्गी लागले होते.
हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादीची घोषणा
कैलासनगर (हॉटेल मिरची) चौफुलीवर मनपाचा वळण रस्ता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाशिक-औरंगाबाद महामार्ग परस्परांना छेदतो. वळण रस्त्यावर पुण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ असते. औरंगाबाद मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. अपघातानंतर मनपाने गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रम्बल स्ट्रीप) उभारणी केली. अपघात प्रवण क्षेत्र व गतिरोधकाचा फलक लावले. संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. म्रची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. इतर अपघातप्रवण क्षेत्रातही लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. कैलासनगर चौकात कायमस्वरुपी उपायासाठी महामार्गावर उड्डाण पुलाची उभारणी गरजेची असल्याकडे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लक्ष वेधले होते. या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार आहे.
हेही वाचा >>>घोटीत दरोडेखोरांचा धुमाकूळ ; हल्ल्यात पाच जण जखमी
अतिक्रमणे हटविण्यास प्रतिसाद
कैलासनगर (हॉटेल मिरची) या अपघातप्रवण चौफुली भोवतालचे अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यास प्रतिसाद देत अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. सोमवारी १२ ते १३ व्यावसायिकांनी अतिक्रमीत बांधकाम काढून टाकले. टपऱ्या हटवल्या. पत्रे काढून टाकले आहेत. या चौकासह संपूर्ण मार्गावर नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामाचे रेखांकन करून दिल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावली गेली होती. नोटीस मिळालेल्या अनेकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणास लगेच सुरूवात केली जाणार आहे. नोटीसला प्रतिसाद न देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.