गणेशोत्सवात शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींची विक्री रोखण्यासाठी महापालिका विक्रेत्यांकडून कक्ष उभारणीची परवानगी देतानाच या मूर्ती विक्री न करण्याचे हमीपत्र भरून घेणार आहे. डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानासह इतरत्र खासगी कक्ष स्थापणाऱ्या विक्रेत्यांना याबाबत सूचना करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी गणेशभक्तांना शाडू मातीची मूर्ती उपलब्ध कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> नाशिक: रिमझिम पावसातच खड्डेमय!
१९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांंनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, या अनुषंगाने झालेल्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्ती विक्री व साठा करण्यास प्रतिबंध केलेला आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आली आहे. त्यानुसार मूर्ती विक्रेते व पीओपीचा साठा करणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, असे आयुक्त डॉ. करंजकर यांनी सूचित केले. गेल्या वर्षी २४९ ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे कक्ष उभारण्यात आले होते. विक्रेत्यांनी शाडूमातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात तसेच भाविकांनीही शाडूच्याच मूर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे. मूर्तींसाठी पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले.
हेही वाचा >>> मणिपूर हिंसाचार निषेधार्थ मोर्चाला सटाण्यात गालबोट; वाहनांवर दगडफेक
गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मनपाची परवानगी घ्यावी. ही परवानगी घेताना संबंधितांकडून पीओपी मूर्तीची विक्री न करण्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. शहरात अनेक भागात खासगी संस्था व व्यक्ती गणेश मूर्तींची दुकाने थाटतात. संंबंधितांना हा नियम लागू राहणार आहे. पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही. शाडू मातीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होते. गणेशोत्सवात गाेदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. विसर्जनासाठी शहरासह उपनगरांमध्ये नेहमीप्रमाणे कृत्रिम तलाव उभारले जातील. गणेशोत्सवात बांधकाम, आरोग्य विभागामार्फत मूर्ती संकलन केले जाते. या वर्षी आकर्षक कृत्रिम तलाव व अधिकाधिक गणेश मूर्ती संकलन करणाऱ्या निवडक पथक व कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार येईल. बैठकीस पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे आदी उपस्थित होते.