वारंवार पाठपुरावा करूनही शहरातील १२५८ महाथकबाकीदारांकडील सुमारे ५० कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल होत नसल्याने महानगरपालिकेने संबंधितांच्या घरासमोर थेट ढोल वादनास सुरूवात केली. पूर्व विभागात अनेकांचे निवासस्थान, दुकानांसमोर ढोल बडवत थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले. मनपाच्या पवित्र्याने धास्तावलेल्या काहींनी तातडीने पथकाकडे धनादेश सोपवत ढोल वादन होऊ नये याकरिता धडपड केली.

हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादीची घोषणा

मनपाच्या विविध कर आकारणी विभागाने शहरातील १२५८ मालमत्ता महाथकबाकीदारांची यादी यादी प्रसिध्द केली होती. त्यांच्याकडे ४९ कोटीहून अधिकची रक्कम थकीत आहे. करोना काळात कर संकलनावर विपरित परिणाम झाला होता. मोठी थकबाकी असणाऱ्यांकडून ती रक्कम भरण्याकडे पूर्णत दुर्लक्ष केले गेले. ही बाब लक्षात घेऊन मनपाने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बडविण्याचे निश्चित केले. सर्वाधिक म्हणजे २० कोटींची थकबाकी एकट्या पूर्व विभागात आहे. त्यामुळे याच भागातून ढोल वादनाची सुरूवात झाली. मेनरोड, फावडे गल्ली, सर्फराज लेन, घनकर गल्ली, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आदी भागातील बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वादन करण्यात आले. मनपाच्या पथकात कर निरीक्षक महेंद्र परदेशी, अविनाश अहिरे, विश्वजित काटे, कारभारी कापडणीस, योगेश रकटे आदींचा समावेश आहे.पहिल्या दिवशी पूर्व विभागातून २८ लाख ७४ हजार ६९१ रुपयांची वसुली झाली. पूर्व विभागात एकूण ६०० बडे थकबाकीदार आहेत. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत २५ ते ३० थकबाकीदांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. ढोल पथकाच्या सोबतीने ही मोहीम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अन्य विभागातील बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर वसुलीसाठी ढोल बडविण्यात येणार असल्याचे कर विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>नाशिक : कैलासनगर चौकात उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव ; अपघातप्रवण क्षेत्रातील धोके कमी करण्याचा उपाय

विभागनिहाय थकबाकी
नाशिक पूर्व – २० कोटी ५५ लाख
नाशिकरोड – आठ कोटी ४६ लाख
नाशिक पश्चिम – आठ कोटी ३२ लाख
सिडको – सहा कोटी ७३ हजार
सातपूर – पाच कोटी ७९ लाख
पंचवटी – ६९ लाख ७३ हजार

हेही वाचा >>>घोटीत दरोडेखोरांचा धुमाकूळ ; हल्ल्यात पाच जण जखमी

पहिल्याच दिवशी ७४ लाखांची वसुली
ढोल वादनाचे दृश्य परिणाम लगेच समोर आले. पहिल्या दिवशी सुमारे ७४ लाखांची वसुली झाली. शहरात एकूण ७३ बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वादन करण्यात आले. त्यामुळे नाशिक पूर्व विभागात २८ लाख, नाशिक पश्चिम २५ लाख ५० हजार, नवीन नाशिक पाच लाख २० हजार, पंचवटी साडेतीन लाख, नाशिकरोड पाच लाख ८९ हजार व सातपूर विभागात साडेपाच लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.

Story img Loader