कोट्यवधींचा मालमत्ता कर अर्थात घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महानगरपालिकेने मालमत्ता जप्तीची मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. लिलावात प्रतिसाद न लाभल्यास संबंधित मालमत्तेवर महापालिकेचे नाव लावण्यात येणार आहे.
हेही वाचा- जयंत पाटील यांच्या निलंबन निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन
महापालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी आहे. करोनाच्या निर्बंधात बराच काळ सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे अनेकांचे अर्थकारण विस्कळीत झाले. त्याचा परिणाम महानगरपालिकेची थकबाकी वाढण्यात झाली. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने थकबाकी वसुलीसाठी कठोर पाऊल उचलणे टाळले होते. काही महिन्यांपूर्वी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली. तथापी, काही दिवसांत ती गुंडाळण्यात आली. महापालिकेने चालु वर्षात १५७ कोटी रुपयांचे वार्षिक करवाढीचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत १२० कोटी ५८ लाख रुपयांची वसुली झाली. पण, आधीची थकबाकी समाविष्ट केल्यास ती रक्कम २५० कोटींच्या घरात जाते.
हेही वाचा- जळगावात सत्ताधारी-विरोधकांत आंदोलनासाठी रंगली स्पर्धा; महापालिकेसमोर ठाकरे गट-भाजप समोरासमोर
थकीत कराच्या वसुलीचे आव्हान पेलण्यासाठी थकबाकीदारांना लवकरच सूचनापत्र दिले जातील. त्यानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल. या मालमत्तांचा लिलाव करून थकबाकी वसुलीचे नियोजन आहे. परंतु, या लिलावांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. तसे झाल्यास जप्त मालमत्तेवर महापालिकेचे नाव लावले जाईल, असे पालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.