प्रधानमंत्री आत्मनिर्धार निधी (पीएम स्वनिधी) योजनेची महानगरपालिकेने प्रभावीपणे अमलबजावणी करीत शहरात पथ विक्रेत्यांना बँकेमार्फत २० कोटी ४८ लाखाचे कर्ज वितरित करीत राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमापैकी एक असलेल्या या योजनेत महानगरपालिकेने लक्षणीय यश मिळविल्याचे उपायुक्त (राष्ट्रीय नागरी उपजीविका विभाग) करूणा डहाळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- विमान प्रवासासाठी मुंबई, शिर्डीकडे धाव; धावपट्टी दुरुस्तीमुळे नाशिकची सेवा बंद
शासनाने महानगरपालिकेला कर्ज वितरणाचे १७.४० कोटींचे उदिष्ट दिले होते. २१ नोव्हेंबर रोजी ते १०१ टक्क्यांनी पूर्ण करण्यात आले. मनपाने पथ विक्रेत्यांना बँकेमार्फत २० कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. फेरीवाल्यांना कर्ज वितरणात महानगरपालिका राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रथम आहे. त्यांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ठ्य १११ टक्क्यांनी पूर्ण झाले.
नाशिकमध्ये प्रत्यक्ष कर्ज वितरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १७ हजार ९६८ आहे. ज्या पथ विक्रेत्यांनी १० हजारांचे कर्ज घेऊन परतफेड केली आहे. त्यांनी २० हजार रुपयांच्या कर्जासाठी मनपाकडे अर्ज करावा, असे आवाहन मनपाने केले आहे. २४ नोव्हेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया महिनाअखेरपर्यंत प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढणार आहे. इतर सर्व बँकांही नोव्हेंबर अखेरपर्यंत उर्वरित पथ विक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. पथ विक्रेत्यांनी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेत जावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डहाळे यांनी केले.
हेही वाचा- जळगाव जिल्हा दूध संघासाठी ठकसेन पाटलांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य; नाशिकच्या विभागीय उपनिबंधकांचा निकाल
२५३२ अर्जदार आजही कर्जाच्या प्रतिक्षेत
मनपाला पथविक्रेत्यांकडून २५ हजार १०१ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १०५६ अर्ज नाकारण्यात आले. २५३२ अर्ज बँकेने स्विकारले. पण अजून त्यांना मंजुरी मिळालेली नाही. ३५४५ अर्ज मंजूर झाले आहेत. पण अजून बँकेकडून कर्ज वितरण झाले नाही. प्रत्यक्ष कर्ज वितरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या १७ हजार ९६८ आहे.