नाशिक – महानगरपालिकेने शहरातील वृक्षतोड, फांद्यांच्या छाटणीसाठी परवानगीची प्रक्रिया गतिमान केली आहे. या स्वरुपाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यापासून परवानगी मिळेपर्यंत बराच कालापव्यय होतो. नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना मनपा कार्यालयात खेटे मारावे लागतात. संबधितांचा हा त्रास कमी करण्यासाठी शहरात आता २५ पेक्षा कमी वृक्षांची तोड अथवा फांद्या छाटणीच्या परवानगीसाठी ऑफलाईनऐवजी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे. यात नागरिकांना वेळेत सुविधा पुरविणे याचाही अंतर्भाव आहे. या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी महानगरपालिकेत कृती कार्यक्रम सुयोग्य पध्दतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि मनपा आयुक्त खत्री यांनी वृक्षतोड व वृक्ष छाटणीकरीता अर्ज प्राप्त होण्यापासून अंतिम परवानगी मिळेपर्यंत लागणाऱ्या मोठ्या कालावधीवर तोडगा काढण्यावर नियोजन केले.

अर्ज केल्यानंतर त्याची सद्यस्थिती समजण्यासाठी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना वारंंवार कार्यालयात भेट द्यावी लागते. या परवानगीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊन आयुक्तांनी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाशी संबंधित वृक्ष तोडणे आणि वृक्षांची छाटणी करण्याची परवानगी, उद्यानांना भेटी देणे आदी सेवा ऑनलाईन करण्याचे सूचित केले होते.

त्यानुसार उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने या सेवांसाठी खास संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाद्वारे नागरिक व बांधकाम व्यावसायिकांना धोकादायक अथवा बांधकामबाधित वृक्ष तोडणी अथवा छाटणीच्या परवानगीसाठी मनपा कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. या संकेतस्थळावर संबंधित परवानगीसाठी अर्ज दाखल करू शकतात, असे महानगरपालिकेने म्हटले आहे.

दरम्यान, नागरिकांकडून घर परिसरातील धोकादायक वृक्ष अथवा फांद्या तोडण्याबाबत परवानगी मागितली जाते. या झाडांची संख्या अतिशय मर्यादित असते. परंतु, बांधकाम प्रकल्पासाठी एखाद्या भूखंडावरील बरीच झाडे तोडणे क्रमप्राप्त ठरते. संबंधितांना ऑफलाईनऐवजी ऑनलाईन सेवा देण्याचे मनपाने निश्चित केले आहे. या नव्या व्यवस्थेतून ऑफलाईनमधील कालापव्यय निश्चित टाळता येईल. वृक्षतोडीची परवानगी नेमकी कुणासाठी गतिमान केली गेली, याची चर्चा होत आहे.

नागरिक, बांधकाम व्यावसायिकांना २५ पेक्षा कमी वृक्षांची तोड अथवा छाटणीची परवानगी मिळविण्यासाठी कार्यालयात ऑफलाईन अर्ज देण्याची गरज नाही. संबंधितांनी ऑफलाईन अर्ज न करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. – विवेक भदाणे (उद्यान अधीक्षक, मनपा)