नाशिक – गोदावरी नदीपात्र पाणवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दृष्टीपथास पडत नसताना पाणवेली काढण्यासाठी वापरात असलेल्या ट्रॅशस्किमर यंत्र चालविण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीवर मात्र खर्च कायम आहे. पुढील पाच वर्षे हे यंत्र चालवणे व देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा दोन कोटींच्या खर्चाला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
शहरातून वाहणाऱ्या गोदावरीत सांडपाणी मिसळत असल्याने पाणवेली पसरतात. काही भागात तर जणू फुटबॉलचे मैदान तयार झाल्याचे भासते. गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ट्रॅशस्किमर यंत्र खरेदी केले. कंपनीने पाच वर्षे ते चालविण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिल्लीतील क्लिनटेक इन्फ्रा कंपनीवर सोपविली होती. या काळात यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, आदी जबाबदारी मूळ मक्तेदाराची आहे. हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिककडे हस्तांतरीत केले. आधीच्या करारनाम्याची मुदत फेब्रुवारी २०२५ मध्ये संपुष्टात येत आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी उपरोक्त कामांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. हे यंत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारीत आहे. पुढील पाच वर्षे ते चालविणे व देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण दोन कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान दुपारी बंद
त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान दिवसभर खुले असल्याने दुपारी व रात्रीच्या वेळी उपद्रवी टवाळखोरांकडून मैदानावरील साहित्याची नासधूस केली जाते. या पार्श्वभूमीवर आता सकाळी ११ ते दुपारी चार या कालावधीत हे मैदान बंद ठेवले जाणार आहे. पहाटे चार ते सकाळी ११ आणि दुपारी चार ते रात्री १० या कालावधीत या मैदानात प्रवेश मिळणार आहे. मैदानाची स्थिती आणि टवाळखोरांचा वाढता उपद्रव याकडे आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले होते. सर्वसाधारण सभेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात नागरिकांसाठी वेळ निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली.