नाशिक – पाणी पुरवठ्यातील समस्यांमुळे नागरिकांच्या रोषाला तोंड देणाऱ्या महापालिकेने काही विशिष्ट ठिकाणी विंधन विहिरींतील पाणी उपलब्ध करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मनपा इमारती, उद्यान, शौचालये, दवाखाने व शाळा आदी ठिकाणी टंचाईच्या काळात आणि नळ जोडणी नसलेल्या भागासह झोपडपट्टीत विंधनविहिरी करून हातपंप अथवा विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘गुरूशाला’ : आदिवासी विकास विभागाचा उपक्रम
सर्वसाधारण सभेत ५० लाख रुपयांच्या या कामास मान्यता देण्यात आली. मनपाचे वेगवेगळे विभाग विविध कारणास्तव विंधन विहिरीची मागणी करतात. मनपा शाळा, उद्याने, शौचालये, दवाखाने या ठिकाणी तशीच मागणी असते. त्यासाठी मनपा क्षेत्रात विंधनविहिरी करून हातपंप व विद्युत पंप बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. काही महिन्यांपासून शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या कारणास्तव अनेकदा आंदोलने झाली होती. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठ्याच्या समस्या उद्भवत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा दिला गेला होता.
हेही वाचा >>> परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई; शिक्षण मंडळाचा इशारा
मध्यंतरी एकाच दिवशी अनेक वाहिन्यांमधील गळती दुरुस्ती आणि वितरण प्रणालीतील कामे करण्यात आली होती. सध्या तक्रारी कमी झाल्या असताना महापालिकेने विंधनविहिरींच्या माध्यमातून काही भागात पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. याआधी अनेक भागात विंधनविहिरी करून हातपंप बसविले गेले. बगीचा व मोकळ्या भूखंडात हातपंप दृष्टीपथास पडतात. परंतु, त्यातील बहुतांश हातपंप आज वापरात नाहीत. विंधन विहिरी पाणी टंचाईच्या काळात उपयोगी ठरतील, असा विचार पाणी पुरवठा विभागाने केला आहे. मनपा इमारती, उद्याने, शौचालये, दवाखाने, शाळा, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी विंधनविहिरींचे पाणी वापरण्याचा मनपाचा विचार आहे. या कामासाठी मंजूर झालेल्या निधीतून सुमारे ४० ते ४५ ठिकाणी विंधनविहिरी करता येतील, असे सांगितले जाते.