नाशिक – महानगरपालिकेतील वादग्रस्त शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांची उचलबांंगडी झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय म्हणून वावरणारे आणि शिक्षकांची मानसिक, आर्थिक पिळवणूक करणाऱ्या विशिष्ट केंद्रप्रमुखांसह त्यांना साथ देणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पाटील यांच्या बदलीनंतर शिक्षण विभागातील वातावरण दुषित करणाऱ्या केंद्र प्रमुखांविरोधातील रोष उफाळून आला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली होती. आंतरजिल्हा बदलीतील गोंधळ, शिक्षक बदल्या व हक्काची रजा देतानाही आर्थिक व्यवहार, केंद्र प्रमुखांकडून केली जाणारी वसुली असे विषय चव्हाट्यावर आले आहेत. शासनाने शिक्षणाधिकारी पाटील यांची बदली करून त्यांच्या वादग्रस्त कारभाराच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. या चौकशीत नियमबाह्यपणे केंद्र प्रमुखांची नियुक्ती, त्यांच्यामार्फत केलेले कारनामे याच्या छाननीची गरज मांडली जात आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी पाटील यांच्या पाठबळाने संघटनेचे पदाधिकारी असूनही काही शिक्षकांनी केंद्रप्रमुख म्हणून आपली वर्णी लावून घेतली. वार्षिक तपासणीच्या नावाखाली शिक्षकांना त्रास दिला गेला. शिक्षिकांचा स्वतंत्र गट तयार करुन दबावतंत्राचे सत्र राबविले. शिक्षिकांच्याा गणवेशाच्या विषयात संबंधितांनी भलतीच रुची घेतली होती. बदल्यांसह हक्काच्या रजेसाठी पैसे लाटल्याच्या तक्रारी होत आहेत. शिक्षकांचे वेतन रखडवणे, कारवाईची धमकी देऊन मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडले. प्रश्नकर्त्या शिक्षिकांना अवमानित करणे, कारवाईची धमकी देण्याचे प्रकार घडल्याचे शिक्षक सांगतात. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून बोगस केंद्रप्रमुख शिक्षकांनी केलेली मनमानी व त्यांना साथ देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेने दिला आहे.