नाशिक : निवेदन देणाऱ्या, भावना व्यक्त करण्यासाठी येणाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याची नवीन व्यवस्था राज्यातील हुकूमशाही सरकार जोरकसपणे राबवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. बदलापूर प्रकरणी दाद मागणाऱ्या पीडित कुटुंबियांतील सदस्य व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना नजरकैदेत ठेवले गेले. १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना कुणीही भेटणार नाही, याची दक्षता घेतली गेली, असा दावाही पटोले यांनी केला.
काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी येथे पदाधिकारी मेळावा प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत पटोले आणि चेनिथला यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याकडे लक्ष वेधत निर्ढावलेल्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी शनिवारचा बंद जाहीर करण्यात आल्याचे नमूद केले. बदलापूर प्रकरणात दोषींना वाचवण्याचे प्रयत्न झाले. पुरावे नष्ट करण्यात आले. त्यास संबंधित शिक्षण संस्थेचे संचालक मंडळही जबाबदार आहे. आठवडाभरात १२ ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या ३०० विद्यार्थी, महिलांसह इतरांवर गुन्हे दाखल केले जातात. हुकूमशाही वृत्तीचे संवेदनहीन सरकार सत्तेत असल्याने हे प्रकार घडत असल्याचे पटोले यांनी सांगितले. सरकार महाधिवक्त्यांमार्फत बंदबाबत धमकी देत आहे. बंदच्या दिवशी आम्हाला अटक करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
हेही वाचा…नेपाळ बस अपघातातील मृतांमध्ये जळगावच्या काही भाविकांचा समावेश
निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. आमची राज्यात सत्ता आल्यास वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाराष्ट्रातील भ्रष्ट, असंवेदनशील सरकारला सत्तेवरून पायउतार करणे, हा आघाडीचा धर्म असल्याचे त्यांनी नमूद केले.