नाशिक : भारतीय लष्करातून ब्रिगेडिअर पदावरून निवृत्त महिला अधिकाऱ्याचे आजारपण आणि वृद्धत्वातील असहायतेचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्यांनी सुमारे सव्वा कोटींना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वृध्द महिला अधिकाऱ्याच्या घरातून ३८ धनादेश चोरुन संशयितांनी बनावट स्वाक्षरी करून बँक खात्यातून एक कोटी २३ लाखांहून अधिक रुपये अन्य खात्यांमध्ये वर्ग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत शहरातील दत्तमंदिर रस्त्यावरील मिहिर सोसायटीत राहणाऱ्या ब्रिगेडिअर विस्मत मेरी जेरेमीह (निवृत्त) यांनी तक्रार दिली. या प्रकरणी दिशा टाक, किशोरभाई टाक, सरला टाक, देवांश टाक आणि विकास रहतोगी या पाच संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जेरेमीह या ८८ वर्षांच्या असून १९९४ साली त्या लष्करातून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर कुटूंबात अन्य कोणी नसल्याने त्या मिहीर सोसायटीत एकट्याच वास्तव्यास आहेत. जेरेमीह यांच्याकडे सोसायटीतील सदस्यांचे येणे-जाणे होते. सर्वजण त्यांची आस्थेने विचारपूस करत असल्याने त्यांचा सर्वांवर विश्वास होता. या काळात शेजारी राहणारे टाक कुटूंबिय अधूनमधून चौकशी करायचे. २०२० मध्ये आजारपणात शेजारी राहणाऱ्या दिशा टाक या मुलीने त्यांची देखभाल केली. या काळात संशयित युवतीने जेरेमीह यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या धनादेश पुस्तिकेतील काही धनादेश चोरून बँक खात्यातील रोकडवर डल्ला मारला. ही बाब दुबई येथून परतलेला जेरेमीह यांचा भाचा ॲन्सले याच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. जेरेमीह रुग्णालयात असतानाही संशयितांनी रक्कम काढली.

हेही वाचा…पावसाळ्यातही मालेगावात पाणी कपातीचे संकट, आता तीन दिवसाआड पुरवठा

संशयित युवतीने ३८ धनादेशांवर बनावट स्वाक्षरी करून जेरेमीह यांच्या बँक खात्यातील तब्बल एक कोटी २३ लाख ८५ हजार ३६७ रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले. ही रक्कम म्युच्युअल फंड, मुदत ठेव आणि त्यावर मिळणारे व्याज, दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातील होती. २०२० पासून संशयित युवतीने वडील किशोरभाई टाक, आई सरला टाक, भाऊ देवांश टाक आणि मित्र विकास रहतोगी यांच्या बँक खात्यात ती रक्कम वर्ग केल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असल्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र बैसाणे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik neighbors defraud retired army officer over rs 1 crores using stolen cheques psg