नाशिक : धुळे जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूपासून एकाही पक्षाचा मृत्यू झाला नसतानाही पशुसंवर्धन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात येत आहेत. सतर्कता म्हणून २७ जलद प्रतिसाद पथके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.गिरीश पाटील यांनी दिली.
ठाणे, परभणी या जिल्ह्यात एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा अर्थात ‘बर्ड फ्लू’मुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. अजून धुळे जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झालेला नाही. सध्या जिल्ह्यात सुमारे २० लाख पक्षी आहेत. बाहेरुन येथे स्थलांतरीत होणार्या पक्ष्यांमुळे भविष्यात ‘बर्ड फ्लूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वनक्षेत्रातील पक्ष्यांमध्येही काही आजार आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाला माहिती कळवण्याबाबत सांगितले आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये, याकरीता त्यांनाही जैवसुरक्षिततेबाबत आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
धुळे जिल्ह्यात अजून बर्ड फ्लूचा प्रकार आढळून आलेला नाही. असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८/१९६२ वर त्वरीत दूरध्वनी करुन कळवावे. उकडलेली अंडी आणि शिजवलेले चिकन खाणे आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गैरसमज किंवा अफवा पसरवू नयेत. डॉ.गिरीश पाटील (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, धुळे)
© The Indian Express (P) Ltd