नाशिक जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी अशा ५० हून अधिक जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेच्या आधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा- नागपूर : अतुल लोंंढे यांचे उद्या अर्थसंकल्पावर व्याख्यान
आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या पुढील टप्प्याला सुरुवात करणार असून या यात्रेच्यानिमित्ताने ते नाशिक आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा ५० हून अधिक जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यात जेष्ठ शिवसैनिक व माजी महानगर प्रमुख शिवाजी पालकर, माजी विभाग प्रमुख राजेंद्र घुले, गणेश शेलार, सोपान देवकर, माजी उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव, मंगेश दिघे, शाखा संघटक रामभाऊ तांबे, मयुर जोशी, निलेश शेवाळे यांच्यासह इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेकजण आनंद दिघे यांचे सहकारी आहेत. जिल्ह्यातील उध्दव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून पक्ष प्रवेश करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबांची शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.
हेही वाचा- चंद्रपूर : “मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात”; काँग्रेसचे आंदोलन
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ज्यांनी काम केले होते, त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अधिक बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर, नाशिकमध्ये जो डोलारा उभा झाला, हे सर्व त्या देवळाचे दगड आहेत, त्यांच्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उभी राहिली. आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला आहे. घराणेशाहीच्या विरोधात हा प्रवेश झाला आहे. हिंदुत्वाला पाठींबा देण्यासाठी हा प्रवेश या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, अशी प्रतिक्रीया बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.