नाशिक : सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत समाजातील वंचित घटकातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे यासाठी शालेय प्रवेशाकरिता मंगळवारपासून २७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४०७ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. संबंधित पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, पोलीस कल्याणकारी आणि महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के प्रवेश आरक्षित करण्यात येतात. यंदा ४०७ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

हेही वाचा…७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही

अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास, एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके, अनाथ, अपंग (ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे) अशा बालकांसाठी पालकांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल. अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे. पालकांनी या केंद्रांवर संपर्क करुन अचूक माहिती भरावी. पालकांनी विहित वेळेत अर्ज दाखल करावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader