नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून अर्ज दाखल करण्यासाठी येताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येतील, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी तीन ही वेळ आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा – नाशिक : सुरगाण्यात वादळी पावसाने नुकसान, वीज कोसळून एकाचा मृत्यू
हेही वाचा – मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीत यावे, संभाजीराजे भोसले यांची भूमिका
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार असून त्यासाठी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निशाणी आधीच करुन ठेवतील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच जणांनाच प्रवेश देण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी पोलीस विभागाकडून सहायक आयुक्त, उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून प्रमुख अधिकारी संबंधित ठिकाणी आवश्यक बंदोबस्तासह उपस्थित राहतील. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी केली आहे.
© The Indian Express (P) Ltd