नाशिक – त्र्यंबक नगरीत शनिवारी चैत्र महिन्यातील एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून १५ हून अधिक दिंड्या दाखल झाल्या. दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना चंदनाची उटी लावण्यात आली. रात्री उशीराने ही उटी भाविकांना प्रसाद स्वरुपात देण्यात आली.
हेही वाचा – नाशिक : सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या
हेही वाचा – नाशिक : विजय करंजकर कुटुंबाकडे ३९३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने
चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला विशेष महत्व आहे. उटीवारीसाठी कडाक्याच्या उन्हात दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या. मंदिर परिसर वारकऱ्यांनी गजबजला. दुपारी संत निवृत्तीनाथ समाधी तसेच विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला. यावेळी भजन, हरिपाठ झाले. काल्याचे कीर्तन जयंत महाराज गोसावी यांनी केले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधीवरून उटी उतरविण्यात आली. उटी उतरल्यानंतर ती द्रवरुपात भाविकांना वाटण्यात आली. यासाठी २०० लिटरचे सात ते आठ पिंप देवस्थान परिसरात तयार ठेवण्यात आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान परिसरात पिण्याचे पाणी तसेच अन्य सुविधा करण्यात आली होती.