नाशिक : निफाड तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी विविध प्रकारच्या पान वनस्पती आणि पानवेलींमुळे झाकोळून गेली आहे. नदीपात्रात या पानवेलींचा पसारा इतका वाढला आहे की नदीपात्रास हिरव्या कुरणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
गोदावरी, दारणा आणि उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने गोदावरीतील पाण्याची पातळी वाढली आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील गोदापात्रात विसर्ग केला जात आहे. यामुळे प्रवाहाला वेग आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे नदीपात्रात फोफावलेल्या पानवेली आणि अन्य पान वनस्पती या वेगवान प्रवाहात वाहून जाणे सुरु झाले आहे. या वाहून जाणाऱ्या पानवेली करंजगाव आणि कोठुरे दरम्यान नदीपात्रातील पुलाच्या भिंतींना अडकत आहेत. यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रचंड फुगवटा निर्माण होऊन पुलाला तसेच आजूबाजूच्या शेतजमिनींना धोका निर्माण झाला आहे. पुलाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने या पुलाला अडकलेल्या पानवनस्पतींचे जंजाळ मोकळे करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…दिंडोरीतून नरहरी झिरवळ महायुतीचे उमेदवार; सुनील तटकरे यांची घोषणा
सायखेडा, चांदोरीकडून कोठूरेकडे वाहून आलेल्या या पानवेली नदीपात्रातून बाहेर काढणे अशक्य असल्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे ढकलून देणे हे जास्त योग्य समजले जाते. यामध्ये मनुष्यबळ आणि खर्च यात बचत होत असली तरी या पानवेली नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या भिंती, व्दार आणि नदीपात्रातील अन्य पुलांना अडकण्याचीच अधिक शक्यता आहे.
© The Indian Express (P) Ltd