नाशिक – जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुती कक्षात बाळंतपणानंतर मुलगा झाल्याची माहिती पालकांना देण्यात आली. परंतु, हातात मुलगी दिली, असा गंभीर आरोप करुन नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी दिला आहे.

नांदुरनाका येथील कृतिका पवार या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसुती कक्षात दाखल झाल्या होत्या. प्रसुतीनंतर बाळाची नोंद पुरुष जातीचे अर्भक असल्याची नोंद करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. बाळाला उपचारासाठी रुग्णालयातील बाळांसाठी असलेल्या कक्षात नेण्यात आले. त्यानंतरही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी नातेवाईक बाळाचे डायपर बदलत असताना हा मुलगा नसून मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातला.

हेही वाचा – नाशिक : सुरगाण्यात वादळी पावसाने नुकसान, वीज कोसळून एकाचा मृत्यू

हेही वाचा – नाशिक : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात तीन वाहनांनाच परवानगी, इच्छुक उमेदवारांना सूचना

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात त्यांनी ठिय्या दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी प्रकाराचे गांभीर्य ओळखून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीने बाळाच्या जन्माच्या वेळी करण्यात आलेल्या नोंदी तसेच सीसीटीव्ही चित्रणासह अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे डाॅ. शिंदे यांनी नमूद केले.