नाशिक : चोरीच्या दुचाकींचा रंग बदलून बाजारात विकणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांच्या मोटार सायकल चोरी शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख १२ हजार रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
शहर परिसरात दुचाकी चोरीच्या तक्रारी वाढल्याने पोलीस आयुक्तालयातील दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी मोटार सायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि पथकातील अंमलदार मोटार सायकल चोरांचा शहरात शोध घेत असताना संशयित सिध्दांत सपकाळे (२०, रा. समता नगर) याने पंचवटी भागातून चोरलेली दुचाकी संशयित मोईन अन्सारी याच्याकडे रंगकामासाठी दिली असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या अनुषंगाने सातपूर येथील महिंद्रा सर्कल येथे सापळा रचत संशयित अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा…टाकेहर्ष महिलांचे पाण्यासाठी आंदोलन
u
त्याच्याकडे चौकशी केली असता सपकाळेने दुचाकी चोरुन ती रंग बदलण्यासाठी दिल्याचे अन्सारीने सांगितले. दुचाकीचा रंग बदलून तिची विक्री झाल्यानंतर मिळणारे पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून सपकाळेने पंचवटी, उपनगर, नाशिकरोड, भद्रकाली अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. साधारणत: पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. संशयित अन्सारी आणि जप्त केलेल्या दुचाकी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.