नाशिक : दुचाकीस्वारास पुढेपर्यंत सोडण्याची विनंती करुन त्यास नाशिकरोडच्या बोधलेनगर परिसरात लुटणाऱ्या दोन जणांना गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. जेलरोड येथील अँथनी साळवे (६५) हे चर्चमधून त्यांच्या दुचाकीने घरी जात असताना एकाने त्यांना पुढेपर्यंत सोडण्याची विनंती केली. साळवे यांनी त्यास दुचाकीवर बसविले. संशयिताने बोधले नगर परिसरात दुचाकी थांबवायला सांगून त्याच्या मित्रास बोलावले.
संशयिताचा मित्र आल्यावर दोघांनी दुचाकीस्वाराची सोन्याची अंगठी, चांदीची अंगठी, भ्रमणध्वनी असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजोरीने हिसकावला. या प्रकरणी साळवे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकास सूचना केल्या.
हेही वाचा…नाशिक : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार
पथकातील अंमलदार राजेश राठोड यांना संशयित नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. रेल्वे स्थानक परिसरात अनिल इंगळे (२२, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अभिषेक चौघुले (२४, रा. अवधूतवाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पैशांची गरज असल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील मुद्देमाल सिल्लोड येथे असल्याची माहिती त्यांनी दिली. संशयितांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले