नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरात दुचाकीस्वाराची लूट करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार तसेच रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.रेडियन्ड कॅश मॅनेजमेंट लि. चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेत सागर चौधरी हे रोखपाल व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे सिन्नर तालुका क्षेत्र असून त्यांच्याकडील रक्कम बँकेत भण्यासाठी तसेच अन्य जमा झालेले धनादेश आदींचा भरणा करण्यासाठी ते दुचाकीने सिन्नर औद्योगिक परिसरातून जात असताना त्यांची अडवणूक करुन मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील सात लाख, ५३ हजार ४१६ रुपये लुटण्यात आले. याप्रकरणी चौधरी यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख राजु सुर्वे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करुन गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सिन्नर एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली. अमोल ओढेकर (रा. शिंदेगाव), शुभम पवार (रा. पळसे) यांनी ही लूट केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता महेश पठारे, सागर चव्हाण, प्रसाद गायकवाड (तिघे रा. विंचुर), गौरव भवर आणि गणेश गायकवाड (रा. मानोरी), सूरज पाकळ (रा. शिर्डी) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
हेही वाचा…नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास
चोरीतील रक्कम आपआपसात वाटून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच सात लाखापेक्षा अधिकची रक्कम जप्त केली. यातील महेश पठारे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सूरजवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
© The Indian Express (P) Ltd