नाशिक : गई बोला ना…ढिल देरे, या घोषणांसह हिंदी, मराठी थिरकत्या गाण्यांवर शहरासह जिल्ह्यात मकरसंक्रांतीनिमित्त पतंगप्रेमींनी पतंगबाजीचा आनंद घेतला. सकाळपासून वारा वाहू लागल्याने पतंगप्रेमींचा उत्साह सकाळपासूनच टिपेला होता. नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्तीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मांजापासून संरक्षणासाठी अनेक दुचाकी चालक, पादचारी यांनी गळ्याभोवती रुमाल गुंडाळल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी सकाळी शहर परिसरात वारा जोरात असल्याने पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. मोकळ्या मैदानात, इमारतींच्या गच्चीवर, रस्त्यात मिळेल त्या ठिकाणी पतंगप्रेमींनी ठाण मांडले. काहींनी संगीताच्या दणदणाटात पतंगबाजीचा आनंद घेतला. इमारतींच्या गच्चींवर पतंग उडवितांना काही ठिकाणी खाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. केवळ लहान मुलेच नव्हे तर, युवावर्ग, ज्येष्ठ, महिलाही पतंगोत्सवात रममाण झाल्या होत्या. बहुसंख्य मंडळी पतंग उडविण्यात दंग असताना काही युवक तुटलेले पतंग पकडण्यासाठी धावत होती. अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी पतंग उडविण्याऐवजी काही तरुणांनी मैदानात जाऊन पतंग उडविण्याचा आनंद घेतला. दुसऱ्याची पतंग तुटल्यावर जल्लोष केला जात होता. एकमेकांच्या पतंगी काटण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले जात होते.

हेही वाचा…नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार

दरम्यान, नायलॉन मांजाच्या भीतीमुळे दुचाकीचालक तसेच पादचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. काही अपघातही झाले. पोलिसांनी कोणी नायलॉन मांजाचा वापर करत नाही ना, याची ठिकठिकाणी तपासणी केली. काँग्रेस सेवादलाच्या वतीने शहर परिसरातून गोळा करण्यात आलेल्या नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.

महावितरणची सावधगिरी

पतंगोत्सव साजरा करताना वीज वाहिन्या, रोहित्र आणि अन्य वीज यंत्रणेत पतंग अडकल्यावर पतंग काढण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. काही जण वीज वाहिन्यांवर पाय देत पुढे जातात. यामुळे पाहता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या वतीने शहर परिसरातील काही भागांमध्ये सावधगिरी म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

हेही वाचा…नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी

येवला पतंगोत्सव

संपूर्ण महाराष्ट्रात येवला येथील पतंगोत्सव प्रसिध्द आहे. तीन ते चार दिवस रंगणाऱ्या या पतंगोत्सवात संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अधिक रंग भरतो. शहरातील प्रत्येक घराच्या गच्चीवरुन सहकुटूंब, मित्रांसह पतंगबाजी करण्यात आली. दरवर्षी संक्रांतीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे येवल्यात उपस्थित राहून पतंगबाजीचा आनंद घेतात. यावर्षी माजी खासदार समीर भुजबळ हे पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह पतंगोत्सवात सामील झाले. पारेगाव परिसरात दत्तात्रेय जेजूरकर यांना मांजामुळे दुखापत झाली. त्यांची समीर भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police inspected various places to prevent use of nylon manja during makar sankranti sud 02