नाशिक : लूटमार, प्राणघातक हल्ला असे आरोप असणाऱ्या बाशी उर्फ शिवम बेहनवाल टोळीवर शहर पोलिसांनी केलेल्या मोक्का कारवाईस अप्पर पोलीस महासंचालकांनी शिक्कामोर्तब केले आहे. या टोळीविरोधात मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याचे आदेश अप्पर महासंचालकांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम बेहनवाल (२३, रा.फर्नांडिसवाडी, जयभवानी रोड), नेम्या उर्फ रोशन पवार (रा.निलगिरीबाग,औरंगाबादरोड), अमन वर्मा (रा.वंदे मातरम अपार्टमेंट, औटेमळा), भैयू उर्फ सत्यम ढेनवाल (रा.एकलहरारोड,हनुमाननगर), रोहन राठोड उर्फ पियूष खोडे, सुधांशू उर्फ सोनू बेद (रा. दोघे फर्नांडिसवाडी, नाशिकरोड), मोहिज शेख (रा. विठ्ठल मंदिराजवळ, विहितगाव), बिडी उर्फ गौरव मुकणे (रा. देवळाली कॅम्प), चिक्या उर्फ मितेश परदेशी (रा.देवळाली कॅम्प), शाहिद सय्यद (रा. पाटील गॅरेज मागे, देवळाली गाव) आणि भावेश उर्फ गौरव आव्हाड (रा. देवळालीगाव) अशी मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या बाशी बेहनवाल टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

हेही वाचा…नाशिक : केवायसी अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्यास विलंब

बाशी बेहनवाल टोळीची नाशिकरोडसह,जेलरोड,जयभवानीरोड आणि देवळाली गाव परिसरात मोठी दहशत आहे. खून, खूनाचा प्रयत्न, लूट असे गुन्हे करून या टोळीने परिसरात मोठी दहशत माजवली. २४ जुलै रोजी एकास जीवे मारण्याची धमकी देत या टोळीने लुटमार केली होती. या घटनेत खिशातील रोकड बळजबरीने काढून घेत या टोळीने सदर व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीसह प्राणघातक हल्ला व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा… सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये उपोषण

पोलिसांनी या टोळीतील सदस्यांना अटक केल्यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलीस तपासात संशयितांनी विविध पोलीस ठाणे हद्दीत संघटितपणे तब्बल २८ गुन्हे केल्याच्या नोंदी मिळून आल्याने आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ ची कलमे समाविष्ट करण्यास परवानगी दिली. सदर गुह्याचा तपास सहायक आयुक्त आनंदा वाघ यांनी केला. तपासात सबळ पुरावे गोळा करून हा अहवाल अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. महासंचालक कार्यालयाने पडताळणीअंती या कारवाईवर शिक्कामोर्तब केले असून मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापुढेही गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीए सारख्या कारवाया केल्या जाणार असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police invoke mcoca against bashi bahenwal gang psg