नाशिक: सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना बऱ्याचदा हुल्लडबाजी, धांगडधिंगा, सार्वजनिक शांततेला धोका पोहचेल, अशी कृती होते. या पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी नागरिकांच्या उत्साहाला लगाम घालण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. नाकाबंदी, अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध, अवैध दारू वाहतूक, अमली पदार्थ तस्करी यावर लक्ष केंद्रीत करतांना हॉटेल, रिसोर्ट, ढाबे यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण भागात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व पोलीस ठाणेनिहाय अधिकारी, कर्मचारी, विशेष पथके सक्रिय झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, मुख्य रस्त्यालगत असलेले हॉटेल, रिसोर्टसह बार अशा ठिकाणांवर पोलिसांची नजर राहणार आहे. यासाठी पोलिसांनी संबंधितांना नियमावली दिली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी शहर पोलीस उपआयु्क्त अंबादास भुसारे यांनी माहिती दिली. शहरातील नेहमीच्या ठिकाणी नाकाबंदीसह पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात राहतील. याशिवाय गस्तही घातली जाईल. मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांचे लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा… धुळे शहरात मुलांनी विनापरवाना वाहन चालविल्यास पालकांना दंड
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी, जिल्ह्यातील हॉटेल, रिसोर्ट यांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे, नाशिक तालुका हद्द परिसरात ही तपासणी सध्या सुरू आहे. अमली पदार्थ हॉटेल, रिसोर्टमध्ये नेऊ नयेत, यासाठी शोध मोहीम सुरू आहे. याठिकाणी येणाऱ्यांची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. पर्यटक आणि त्यांच्या वाहनचालकांनी मद्यपान करू नये, मुंबई, ठाणे, गुजरात येथून या ठिकाणी पर्यटक येतात. अवैध दारू, शस्त्र, अमली पदार्थ पर्यटकांसमवेत आणले जात नाहीत ना, याची तपासणी ३० आणि ३१ डिसेंबर रोजी सुरू राहणार असल्याचे उमाप यांनी स्पष्ट केले.