नाशिक : शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला बुधवारी सकाळी साडेपाच वाजता वेगवेगळ्या मैदानांवर सुरुवात झाली. ग्रामीण दलात पहिल्या दिवशी ३०५ उमेदवार अनुपस्थित राहिले. ३९५ उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडली. शहर भरतीत २१४ उमेदवार गैरहजर होते. २८४ जणांची चाचणी पार पडली. ग्रामीणची चाचणी एक वाजेपर्यंत आटोपल्याने पावसाची झळ बसली नाही. शहर भरतीत पावसामुळे व्यत्यय आला. दुपारी संततधार सुरू राहिल्याने दीड तास मैदानी चाचणी थांबवावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहर पोलिसांच्या आस्थापनेवरील ११८ रिक्त पदांसाठी मैदानी चाचणी पंचवटीतील मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात तर, ग्रामीण पोलीस दलातील ३२ पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी आडगावस्थित पोलीस मुख्यालयाच्या मैदानात होत आहे. सकाळपासून दोन्ही ठिकाणी उमेदवारांची गर्दी झाली. शहर आस्थापनेवरील भरतीसाठी एकूण ७७१७ उमेदवार असून पहिल्या दिवशी यातील ५०० उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे नियोजन होते. ग्रामीण पोलीस दलात ३२२५ उमेदवार असून पहिल्या दिवशी ७०० उमेदवारांची चाचणी घेतली जाणार होती. या प्रक्रियेसाठी ३९५ उमेदवार उपस्थित राहिले. उर्वरित ३०५ उमेदवार गैरहजर राहिल्याचे पोलीस उपअधीक्षक (गृह) नितीन गोकावे यांनी सांगितले. तशीच स्थिती शहर पोलीस दलाच्या प्रक्रियेत होती. ५०० पैकी २८४ उमेदवारांची चाचणी झाली. तर २१४ उमेदवार गैरहजर राहिले.

हेही वाचा…जळगाव : कमळगाव आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

१० उमेदवारांच्या गटानुसार ही प्रक्रिया पार पडली. शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी या पध्दतीने ही प्रक्रिया पार पडत आहे. मैदानी चाचणीत उमेदवारांची छाती, उंची, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (पुरुष), ८०० मीटर धावणे (महिला) व गोळा फेक यांचे मूल्यमापन करण्यात आले. ऊन व पावसाला उमेदवारांना तोंड देता येऊ नये म्हणून दोन्ही ठिकाणी जलरोधक तंबुंची उभारणी करण्यात आली आहे. सहभागी उमेदवारांसाठी नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले. तशीच व्यवस्था आडगावच्या मैदानावर आहे. दुपारी अकस्मात पावसाला सुरुवात झाल्याने मैदानी चाचणी सुमारे दीड तास थांबवावी लागली. मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक असल्याने पावसाने उघडीप घेतल्यानंतर लगेचच चाचणीची प्रक्रिया पार पडल्याचे खांडवी यांनी सांगितले. मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. कुणाला काही शारीरिक त्रास झाला नाही. या ठिकाणी वैद्यकीय पथकही उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहर पोलीस दलातील भरती २९ जूनपर्यंत तर ग्रामीण पोलीस दलातील भरतीची प्रक्रिया २२ जूनपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा…पंचवटी पोलिसांच्या सहकार्याने अंनिसची ‘भोंदूगिरी शून्यावर’ मोहीम

उशिरा आलेल्यांना आज संधी

वेळापत्रकानुसार उमेदवारांनी साडेपाच वाजता हजर राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे भरतीसाठी उमेदवार आदल्या दिवशीच नाशिक मुक्कामी आले असतानाही दोन उमेदवारांना मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात येण्यास विलंब झाला. काहीसा उशीर झाल्याने त्यांची संधी हुकू नये यासाठी गुरुवारी सकाळी पुन्हा त्यांना बोलावण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police recruitment begins amid rain disruptions 519 candidates absent on first day psg