नाशिक : वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला एक कोटीचा मुद्देमाल ७५ तक्रारदारांना परत करण्यात आला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बुधवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी उपस्थित होते. परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. कर्णिक यांनी मनोगत व्यक्त केले. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळेल की नाही, ही तक्रारदारांना शंका असते. परंतु, नाशिक पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यासह ताब्यात घेऊन पुन्हा तक्रारदारांना दिला आहे. त्यामुळे तक्रारदारांना होणारे समाधान आणि आशीर्वाद आपल्याला पिढ्यानपिढ्या कामास येईल, असा विश्वास कर्णिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा
दरम्यान, परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यातील ७५ तक्रारदारांना एक कोटीचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये सातपूर पोलीस ठाण्यातील सहा लाख ३८ हजार २०९, इंदिरा नगरातील १४ लाख ३७ हजार २१४, अंबडमधील १० लाख ८७ हजार ८८०, उपनगर कडील २९ लाख २२ हजार ७५८, देवळालीतील सहा लाख ५२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी बीट मार्शल कर्मचाऱ्यांना आयुक्त कर्णिक यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.