नाशिक – वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरीस गेलेला ८० लाखांहून अधिकचा मुद्देमाल बुधवारी आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत संबंधित ६० तक्रारदारांना परत करण्यात आला. शहरात गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगारांना शोधून त्यांनी चोरलेला मुद्देमालही पोलिसांकडून परत मिळविला जात आहे. एकदा चोरीस गेलेला माल परत मिळण्याची खात्री नसल्याने अनेक जण निराश होतात. परंतु, पोलिसांकडून तपास करुन असा चोरीस गेलेला माल परत मिळविला जात आहे. असा मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. हेच दृश्य बुधवारी दिसले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करून तक्रारदारांना सन्मानाने परत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी परिमंडळ दोन अंतर्गत जप्त केलेला मुद्देमाल आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते तसेच पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यामध्ये ६० तक्रारदारांना ८३ लाख ४३ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत सहा लाख ४० हजार रोख, सोने, चांदीसह दागिन्यांसह एकूण ६४,८८,४४५ रुपये, १७ दुचाकी (सात लाख ८० हजार), तीन चारचाकी वाहने (पाच लाख), भ्रमणध्वनी (३५ हजार) असा मुद्देमाल परत करण्यात आला.

दरम्यान, तक्रारदारांनी आपला चोरीस गेलेला माल परत मिळाला म्हणून पोलीस दलाचे आभार मानले. विशेषत: महिलांना स्त्रीधन परत मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता आला नाही. अनेकींच्या भावना अनावर झाल्या. पोलिसांची ११२ मदतवाहिनी आणि सीपी व्हाॅटसअप नंबरवर तत्परतेने मिळणारा प्रतिसाद, याविषयी समाधान व्यक्त केले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी हा कार्यक्रम शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत होत असल्याचे सांगितले. मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करत तक्रारदारांना परत कसा देता येईल, यादृष्टीने काम चालु असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह परिमंडळ दोनमधील पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.