नाशिक – गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपये स्वीकारताना देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदारावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक कैलास जगताप (५४, मुंजवाड, सटाणा) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २० हजार रुपयांतील १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने जगतापला रंगेहात पकडले. संशयिताने यापूर्वी दोन लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून रंगेहात मिळून आला म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा – नाशिक: चांदवड घाटात मालवाहू वाहनास आग
ही कारवाई विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी सापळा अधिकारी म्हणून काम केले. पथकात हवालदार सुनील पवार, संदीप वणवे, योगेश साळवे, चालक परशुराम जाधव यांचा समावेश होता.