नाशिक – चालू नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना एप्रिल महिन्यात आठ टक्के, मेमध्ये सहा आणि जून महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच ही रक्कम या काळात ऑनलाईन भरून अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येईल.

नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी महानगरपालिकेने प्रथमच २५७.८४ कोटींची वसुली केली. नव्या चालू वर्षात हे वसुलीचे प्रमाण वाढविण्याचा भाग म्हणून आगाऊ कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारक, सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जास्त्रोत, पावसाच्या पाण्याची साठवण, इलेक्ट्रिक वाहन धोरण, वापर करणाऱ्यांना सवलत देऊन प्रोत्साहन दिले जाते. शहरात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ताधारक आहेत.

एप्रिल, मे आणि जून या काळात चालू मागणीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा करणाऱ्यांना करात सवलत मिळणार आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरणाऱ्यांना आठ टक्के, मे महिन्यात सहा टक्के आणि जून महिन्यात तीन टक्के सवलत मिळणार आहे. आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या तीन महिन्यांसाठी ही सवलत आहे. जुलैपासून कुठलीही सवलत मिळणार नाही. जे मालत्ताधारक ऑनलाईन ही रक्कम भरतील, त्यांना अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येईल. तीन महिन्यानंतर ऑनलाईन भरणा करणाऱ्यांना केवळ एक टक्का सवलत मिळू शकेल.

अन्य सवलती कशा ?

सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित गृहनिर्माण संस्था निवासी प्रकल्प – पाच टक्के, पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था व निवासी प्रकल्प – पाच टक्के, सांडपाणी पुनर्वापर उपाययोजना कार्यान्वित सोसायटी व निवासी प्रकल्प पाच टक्के आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र असलेल्या सोसायटी व निवासी प्रकल्पातील निवासी मिळकतींना दोन टक्के सवलत मिळणार आहे. पाणीपट्टीचे देयक प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत एकरकमी भरणा केल्यास नळजोडणीधारकांना एक टक्का किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये यापकी जे कमी असेल तितकी सवलत दिली जाईल.