नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असताना काही ठिकाणी मात्र बससेवा विस्कळीत होत आहे. नाशिक-पुणे बससेवा यापैकी एक. रविवारी सायंकाळी एक तासापेक्षा अधिक वेळ थांबूनही पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांचा खोळंबा कायम होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक-धुळे, नाशिक-बोरिवली, नाशिक-पुणे या मार्गांवर बसच्या फेऱ्या अधिक राहतात. विशेषत: नाशिक-पुणे ही बससेवा सातत्याने सुरू राहते. शनिवार-रविवार या आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांमुळे, मतदान तसेच अन्य काही कारणांमुळे रविवारी मेळा बस स्थानकात पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु, प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या तसेच फेऱ्या कमी होत्या. स्थानकात काही बस उपलब्ध असतााही त्या फेरीसाठी सोडल्या जात नव्हत्या.

हेही वाचा…उत्तर महाराष्ट्र: …तरीही ऐतिहासिक यश

खोळंबा झाल्याने किरण जाधव या प्रवाशाने भूमिका मांडली. जाधव हे पत्नीसह पुण्याला जाण्यासाठी रविवारी दुपारी चारनंतर स्थानकात आले. एक तासापेक्षा अधिक वेळ थांबूनही त्यांना शिवशाही, शिवनेरी, शिवाई यापैकी एकही मिळू शकली नाही. नोंदणी दालनाजवळ प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फलाटावर उभ्या असलेल्या गाड्या आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. अखेर सहा वाजेला त्यांना बस मिळाली. पुणे येथे नोकरी करणारे शनिवार आणि रविवारच्या सुटीनिमित्त नाशिकला आल्यावर पुन्हा रविवारी दुपारुन पुण्याकडे रवाना होतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशी परिस्थिती असताना रविवारीच बससेवेला अधिक खोळंबा झाला. प्रवाशांवर तासनतास बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली.

हेही वाचा…उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी ३३ जागांवर महायुती

याविषयी विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी माहिती दिली. बससेवेला खोळंबा झालेला नाही. जनशिवनेरी, शिवाई यांच्या फेऱ्या निश्चित आहेत. त्यासाठी आधीच नोंदणी केली जाते. अशा स्थितीत प्रवाशांची संख्या वाढल्यास जादा बस कुठून आणणार, असा प्रश्न त्यांनी केला. प्रवाशांना इतर बसपेक्षा शिवनेरी, शिवाईचा प्रवास हा आरामदायी वाटतो. ही अडचण केवळ रविवारी येते, असा दावाही सिया यांनी केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik pune bus service blocked passengers for over an hour on sunday evening sud 02