नाशिक – नामांकित भ्रमणध्वनी कंपनीचे बोधचिन्ह वापरुन बनावट सुटे भाग विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. चार दुकानांतून सात लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – गाव आदर्शासाठी लोकसहभाग आवश्यक; संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सोहळ्यात प्रवीण गेडाम यांचे प्रतिपादन

हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्यात मालमोटारीने शंभरपेक्षा अधिक मेंढ्यांना चिरडले

शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर भ्रमणध्वनी दुकानांची बाजारपेठ आहे. या परिसरात हजारोंच्या संख्येने भ्रमणध्वनी दुकाने आहेत. यातील काही दुकानदारांवर बनावट सुटे भाग विक्री करण्याच्या प्रकरणात याआधीही कारवाई झाली आहे. या बाजारपेठेतील बहुसंख्य दुकानदार हे परप्रांतीय आहेत. ग्राहकांशी या दुकानदारांचे अनेक वेळा वाद झाले आहेत. प्रकरण ग्राहकांना हाणामारी करण्यापर्यंतही गेले आहे. शनिवारी पुन्हा या बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. मनीष टेलीकॉम, ओमसाई मोबाईल, मातोश्री मोबाईल, माँ अंबे मोबाईल या दुकानांमध्ये नामांकित कंपनीच्या नावाच्या बोधचिन्हांचा वापर करुन बनावट सुट्या भागांची विक्री केली जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानांवर छापे टाकत बनावट बोधचिन्ह असलेले साहित्य जप्त केले. हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, रमेश कोळी, देवीदास ठाकरे, राम बर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.