नाशिक – थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये सोमवारी तापमानाने ४०.३ अंशाचा टप्पा गाठत हंगामातील सर्वोच्च पातळीची नोंद केली. टळटळीत ऊन व कमालीच्या शुष्क वातावरणात जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गतवर्षी मे महिन्यात तापमानाने ४२ अंशाची नोंद केली होती. सद्याची स्थिती पाहता यंदा तापमान कोणती पातळी गाठणार, याची धास्ती सर्वांना आहे.
अतिवृष्टी, कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर नाशिकची वाटचाल आता तीव्र उन्हाळ्याकडे झाली आहे. रविवारी तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला होता. ४०.२ अंशांची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पारा ४०.३ अंशावर गेला. सध्या आर्द्रतेचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे वातावरणात कोरडेपणा जाणवत असल्याचे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याचे परिणाम शहराबरोबर ग्रामीण भागातही दिसत आहेत. ११ वाजेनंतर उन्हाचे चटके जाणवू लागतात. सायंकाळी पाचपर्यंत ही स्थिती असते. तापलेल्या वातावरणात पुरेशी दक्षता न घेता भ्रमंती करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या काळात रस्त्यांवरील वर्दळ बरिचशी कमी होेते. दुपारी बाजारपेठांमध्ये फारशी गर्दी नसते. उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी बहुतेकांकडून थंडपेय, आईस्क्रिमला प्राधान्य दिले जात आहे. पाच वाजेनंतर बाजारपेठात वर्दळ दिसू लागते.
ग्रामीण भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी आठवडेे बाजारात शुकशुकाट पसरतो. मनमाडच्या आठवडे बाजारात मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला व लासलगाव ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विक्रेते दाखल होतात. तापमानाचा पारा उंचावल्याने बाजारातील उलाढालीवर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगतात. उन्हापासून बचावासाठी त्यांना छत्री वा तत्सम साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. वातानुकलीत यंत्र, फ्रिज, पंखे आदी साधनांची मागणी वाढली आहे.
तापमानाचा सर्वोच्च इतिहास
सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात नाशिकमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद होते. चालू वर्षी बुधवारी म्हणजे सात एप्रिलला तापमान ४०.३ अंशावर पोहोचले. मागील हंगामात एप्रिल महिन्यात ४१.२ अंश या तापमानाची नोंद झाली होती. तर २३ मे २०२४ रोजी पारा हंगामातील सर्वोच्च ४२ अंश पातळीवर गेला होता. १२ मे २०२३ रोजी ४०.७ अंशाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली.