नाशिक : प्रदीर्घ काळ गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमधून थंडी निरोप घेण्याच्या मार्गावर असताना पुन्हा एकदा तापमानाचा पारा खाली आला आहे. चार दिवसांपूर्वी १७ अंशावर पोहोचलेला पारा शुक्रवारी ७.२ अंशांनी घसरून तापमान ९.८ अंशावर आले. उत्तर भारतातील वातावरणाचा हा परिणामआहे. थंडगार वारे वाहात असल्याने फेब्रुवारीत बोचऱ्या थंडीची अनुभूती मिळत आहे. देशातील बहुतेक भागात थंडीचा मुक्काम असल्याने द्राक्षांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी, उत्पादकांना कमी भावात मालाची विक्री करावी लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत द्राक्षाच्या जाळीला ३५० ते ६०० रुपये भाव मिळत आहे.

थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी तशी नवीन नाही. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात दोन-तीन वेळा थंडीची लाट नेहमीच अनुभवता येते. दरवर्षी पडणारी थंडी आणि यंदाची थंडी यात मात्र कमालीचा फरक राहिला. दिवाळीनंतर वातावरणात भरून राहिलेला गारवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ातही कायम आहे. या हंगामात दोन ते अडीच महिने थंडी राहिली. डिसेंबरमध्ये थंडीच्या लाटेने सगळे वातावरण गोठवून टाकले होते. अनेक दिवस तापमान पाच ते नऊ अंशाच्या दरम्यान राहिले होते. याच काळात ५.१ या नीचांकी तापमानाची नोंद झाली. जानेवारीच्या मध्यापर्यंत वातावरण असेच राहिले. वातावरणात कमालीचा गारवा होता. अधूनमधून तापमानात चढ-उतार झाले. जानेवारीच्या अखेरीस पुन्हा थंडीची लाट आली होती. फेब्रुवारीत वातावरणात बदल झाले. थंडीने गारठलेल्या नाशिकच्या तापमानात वाढ व्हायला लागली. चार फेब्रुवारीला कमाल तापमान १७.४ अंश नोंदले गेले. पुढील दोन दिवस १५ आणि १४.४ अंश ही पातळी होती. या बदलांनी थंडीने निरोप घेतल्याचे जाणवू लागले. गारवाही कमी झाला. थंडीतून सुटका झाली असे वाटू लागले, तितक्यात पुन्हा ऋतूचक्र बदलले. शुक्रवारी तापमान घसरून ९.८ अंशावर आले. या दिवशी वाऱ्याचा वेगही अधिक होता.  वाऱ्याने सर्वाना हुडहुडी भरवली. उत्तर भारतात बर्फवृष्टी, थंडी कायम राहिल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वातावरणावर पडतो. गारव्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करावे लागले. गेल्या काही वर्षांतील नीचांकी पातळी पाहिल्यास तापमानाची घसरण प्रामुख्याने जानेवारी किंवा फेब्रुवारीत झाल्याचे लक्षात येते. या हंगामात डिसेंबरच्या अखेरीस नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. हा इतिहास पाहता तापमान पुन्हा खाली घसरते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे.  आजही थंडी कायम आहे. त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागत आहे. थंडीमुळे देशांतर्गत बाजारात द्राक्षाच्या मागणीत अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, द्राक्षांना कमी दर मिळत असल्याची उत्पादकांची तक्रार आहे.

बदलत्या वातावरणामुळे रुग्ण संख्येत वाढ

बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्येही वाढ होत आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.  याबाबतीत  नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. मकरसंक्रातीनंतर गारवा कमी होत उष्मांक वाढण्यास सुरूवात झाली. तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने उन्हाळा सुरू होत असल्याची वर्दी मिळाली. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात तापमानाचा पारा पुन्हा घसरण्यास सुरूवात झाली. बदलत्या वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या साथीच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची भीती  आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात सव्‍‌र्हेक्षणाव्दारे आजारी रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी करत त्यांना आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहे. ताप येणे, घसादुखी, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी अथवा जुलाब अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरित रुग्णालयात उपचार घ्यावे.  सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तींनी बाहेर पडणे टाळावे.  उबदार कपडय़ांचा आधार घेत गरम पाणी, ताजे अन्न खावे. उघडय़ावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे. सर्दी खोकल्याचा प्रभाव वाढल्यास बदलत्या वातावरणामुळे ‘स्वाईन फ्लू’ ची शक्यता नाकारता येत नाही. बालकांनी तसेच ज्येष्ठांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे  डॉ. सुधीर येरमाळकर यांनी सांगितले.

द्राक्षभावाला थंडीचा फटका

या वर्षीचे हवामान द्राक्षांसाठी पोषक राहिले. कडाक्याच्या थंडीमुळे मध्यंतरी काही ठिकाणी बागांची वाढ खुंटणे, द्राक्षमण्यांना फुगवण न मिळणे असे प्रकार घडले. त्यामुळे द्राक्षबागांच्या काढणीचा कालावधी लांबला. देशातील अनेक भागात फेब्रुवारीत थंडी कायम आहे. एरवी, जानेवारीत देशांतर्गत बाजारात द्राक्षांची मागणी वाढू लागते. याच काळात बहुतांश भागातून माल बाजारात येऊ लागतो. या वर्षी थंडीमुळे देशांतर्गत बाजारातून अपेक्षित उठाव नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. थंडी निरोप घेत नाही तोवर द्राक्षांची मागणी वाढणार नाही. मागणी नसल्याने स्थानिक पातळीवर द्राक्षांचे दर घसरले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायंकाळी द्राक्षांचा बाजार भरतो. शेतकरी आपला माल २० किलोच्या प्लास्टिक जाळीत विक्रीस आणतात. गेल्या वर्षी जी जाळी ८०० ते ९०० रुपयांनी विकली गेली, तिला सध्या ४०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. वर्षभर मेहनतीने उत्पादीत केलेल्या मालास अल्प भाव मिळत असल्याची उत्पादकांची खंत आहे.

Story img Loader