नाशिक – पर्यटनाला चालना मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून शहरात वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्यात आले. यामध्ये गंगापूर धरण परिसरातील बोटिंग क्लब, गंगापूर रोडवर दिल्ली हाटच्या धर्तीवर सुरू करण्यात येणारे कलाग्राम, येवला येथील पैठणी क्लस्टर, प्रशिक्षण केंद्र असे एक ना अनेक उपक्रम. यातील काही उपक्रम सुरू असताना कलाग्राम १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कलाग्राम संकल्पनेला मूर्त रुप देण्यास सुरूवात झाली. गंगापूर रोडवरील गोर्वधन शिवारात रस्त्यालगत सुमारे दोन एकर क्षेत्रात हा प्रकल्प आकारास आला. याचे कामकाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून चालु झाले. तत्कालीन पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिक जिल्हा परिसरातील बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी येथे जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक-कला-वस्त्र, खाद्य असे वेगवेगळ्या क्षेत्रातील वैभव असलेल्या वस्तु, पदार्थ या ठिकाणी मांडण्यात येतील. मात्र सत्ताबदल, राजकीय पटलावरील घडामोडी, श्रेयवादाची लढाई यामुळे हा प्रकल्प कधी निधीअभावी तर कधी प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही.
हेही वाचा – पुन्हा एकदा नाशिकरोड-व्दारका उड्डाणपूलासाठी पाठपुरावा
केंद्र सरकारकडून प्राप्त निधी संपल्यानंतर राज्य सरकारकडून निधी मागितला गेला. आता उरलेल्या कामासंदर्भात निविदा काढण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरूवात होईल. याविषयी पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापक जगदिश चव्हाण यांनी माहिती दिली. काही अंतर्गत कामे बाकी आहेत. पुढील पाच ते सात महिन्यात हा प्रकल्प खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी कुंभमेळ्यात नाशिकचा एक नवा पैलु पर्यटकांसमोर येईल, या माध्यमातून खऱ्या अर्थाने पर्यटन, रोजगार याला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.