नाशिक : पत्नी मेंदूविकाराने त्रस्त.. सातत्याने आजारी असल्याने तिला असह्य वेदना होतात. पत्नीचे हे हाल पाहू शकत नसल्याने निवृत्त मुख्याध्यापकाने तिची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्येचे पाऊल उचलले. नाशिक शहरातील जेलरोड परिसरात गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली. पत्नीवर आत्यंतिक प्रेम असल्याने आजारपणातील तिची दुर्दशा पाहू शकत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे या निवृत्त मुख्याध्यापकाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितले.
जेलरोड येथील सावरकर नगरातील एकदंत अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (७८) हे पत्नी निवृत्त शिक्षिका लता जोशी (७६) यांच्याबरोबर राहत होते. त्यांचे दोन्ही मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. लता या काही वर्षांपासून मेंदूविकाराने त्रस्त होत्या. त्यातून त्या सावरल्या होत्या. परंतु अधूनमधून त्यांची तब्येत बिघडतच होती. सततच्या आजाराला जोशी दाम्पत्य कंटाळले होते. बुधवारी सायंकाळी मुरलीधर यांनी लता यांची गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत: गळफास घेतला. त्यांची गृहसेविका नेहमीच्या कामासाठी आली असता आवाज दिल्यावरही दरवाजा न उघडल्याने तिने आजूबाजूच्या रहिवाशांना त्याबद्दल सांगितले. नंतर उपनगर पोलिसांना कळविण्यात आले.

पोलीस घटनास्थळी आल्यावर लता या मृतावस्थेत तर, मुरलीधर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांना घरात मुरलीधर यांनी लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत पत्नी लता यांच्या आजारपणाचा उल्लेख करून तिच्या वेदना पाहणे असह्य होत असल्याने तिची हत्या करत असल्याचे सांगितले. माझे तिच्यावर आत्यंतिक प्रेम असल्याने मीपण आत्महत्या करत आहे, असा उल्लेखही चिठ्ठीत होता. या प्रकरणी मुरलीधर जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी जोशी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

चिठ्ठीत नेमके काय?

‘‘मी मुरलीधर रामा जोशी. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून ५० हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही.’’