लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : आगाामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड रेल्वे स्थानकासाठी सुमारे १६६ कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली. यामध्ये १२ मीटर रुंदीचे दोन नवीन पादचारी मार्ग, जलकुंभ, अस्तित्वातील शौचालयांचे नुतनीकरण आणि १६ नवीन शौचालयांची बांधणी आदींचा समावेश आहे. या माध्यमातून नाशिकरोड रेल्वे स्थानक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

आगामी कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. काही कामांना रेल्वेने मान्यता दिली असली तरी नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण, पूर्वेकडील स्थानक इमारत आदी कामे मान्यतेसाठी रेल्वे मंडळाकडे पाठविली गेली आहेत. ज्या कामांना तूर्तास मान्यता मिळाली ती लवकरच सुरू केली जातील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंजूर झालेल्या कामांमध्ये नाशिक रेल्वे स्थानकात १२ मीटर रुंदीच्या दोन नवीन पादचारी मार्गाचाही अंतर्भाव आहे. रेल्वे स्थानक व कर्षण यंत्र विभागात अनुक्रमे अडीच लाख आणि दोन लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ अर्थात पाण्याच्या टाक्या बांधण्यात येतील. रेल्वे स्थानकावर मेळा नियंत्रक कक्ष विकसित केले जाईल. खास तंत्रज्ञानाने फलाटांचे अस्तरीकरणही करण्यात येणार आहे.

स्थानकावर भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन शौचालयाची संख्या वाढविण्यास मंजुरी देण्यात आली. सध्याच्या शौचालयांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्ष, बैठक सभागृह बांधणे, फलाटांवर रेल्वे गाड्यांचे माहितीदर्शक फलक, प्रवासी माहितीसाठी प्रणालीची तरतूद करण्यात आली. उपरोक्त सर्व कामांची किंमत अंदाजे १६६ कोटी रुपये असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण, ज्यामध्ये पूर्वेकडील स्थानक इमारत, आत-बाहेर जाण्याचे प्रवेशद्वार, वाहनतळ, आणि नवीन दुसऱ्या प्रवेश बाजूच्या इमारतीच्या विस्तारासह विद्यमान पादचारी मार्ग पाडून नवीन पादचारी मार्गांची उभारणी, आदी कामे मान्यतेसाठी रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.