नाशिक : हरसूल आणि त्र्यंबकेश्वर भागात लुटमारीसह घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. विधीसंघर्षित बालकासह पाच जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयितांना हरसूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वेळुंजे गावातील भगवान महाले यांच्या घरातून चोरांनी पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हरसूल परिसरात अजय धोंगडे यांच्या घरात घरफोडी झाली होती. शस्त्राचा धाक दाखवत होणारी घरफोडी, दरोडे पाहता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील तपास न लागलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या.
हेही वाचा…नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने दोन्ही गुन्ह्यातील गुन्हा करण्याची पध्दत, परिधान केलेले कपडे, बोलीभाषा यावरून संशयित हे नाशिक शहर परिसरातील असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार माहिती घेत नाशिक शहरातील चुंचाळे, अंबड, गंगापूर परिसरातून आदित्य सोनवणे (२५, रा. समशेरपूर), किरण जाधव (२३, रा. जाधव संकुल), गोपाळ उघडे (२९, रा. वेळुंजे), सनी कटारे (२१, रा. गंगापूर गाव) यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. संशयितांनी अजय प्रसाद (रा. जाधव संकुल) याच्याकडून मागील दोन महिन्यात चारचाकी वाहन भाड्याने घेत त्र्यंबकेश्वर आणि हरसूल परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. संशयितांच्या ताब्यातून १७ हजार रुपये जप्त करण्यात आले असून हरसूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयितांविरुध्द नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.