नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने सहा ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी त्यांना माहीत असलेल्या ठिकाणांविषयी माहिती कळवावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारंभी अवैध दारू उत्पादन रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापेमारी सुरू केली होती. या कारवाईत दारू उत्पादनांच्या ठिकाणी छापे टाकून तयार मालासह गावठी मद्य निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य जप्त केले होते. चालू वर्षात आजपर्यंत ग्रामीण पोलिसांनी दारूबंदी कायद्याखाली एकूण २८४८ प्रकरणे केली असून त्यात चार कोटी सहा लाख १० हजार ६१२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध सातत्याने कारवाई केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखाविरोधी अभियान राबविले. या अभियानादरम्यान पोलिसांनी गुटख्याची निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या १७८ जणांविरुद्ध १६९ गुन्हे नोंद करून दोन कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा – संभाजी भिडे समर्थनार्थ प्रतिमेस दुग्धाभिषेक; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जळगावात कार्यक्रम
हेही वाचा – नाशिक: सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी
रविवारपासून अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे जाळे शोधून उद्ध्वस्त करणे, हा पोलिसांचा हेतू आहे. यापूर्वी हाती घेतलेले अवैध व्यवसाय निर्मुलनाचे काम सातत्याने सुरू राहील. जिल्ह्यातील सर्वच अवैध व्यवसाय नेस्तनाबूत करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आपल्याकडील उपयुक्त माहिती अवैध व्यवसाय विरोधी मदतवाहिनी क्रमांक ६२६२२५६३६३ यावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहील. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे निर्मुलन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.