नाशिक – नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने २० चारचाकी वाहने सामील करण्यात आली असून लोकार्पण सोहळा पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत एकूण ४० ठाणी, आठ उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये, तर अपर अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव अशी एकूण ५० कार्यालये आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलिसांना वाहनांची कमतरता भासत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

उपलब्धपैकी काही वाहने नादुरूस्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. अलीकडे नागरिकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी ११२ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत नवी मुंबई प्रायमरी कॉल सेंटर आणि नागपूर येथील सेकंडरी कॉल सेंटर येथून अडचणीत असलेल्या नागरिकांच्या तक्रारींची माहिती शीघ्रतेने त्या त्या जिल्ह्यांच्या नियंत्रण कक्षात थेट पुरवली जाते. काही ठिकाणी वाहनसेवाही दिली जाते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी वाहनांची मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलिसांच्या मागण्या लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली.

नवीन वाहनांमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, रात्रग्रस्त , विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदी तसेच पीडितांचे संदेश स्विकारुन शीघ्रतेने कारवाई करण्यासाठी मदत होणार आहे. या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री भुसे, खासदार हेमंत गोडसे , विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik rural police get 20 new four wheelers in presence of guardian minister dada bhuse zws