नाशिक : पोलीस ठाण्यात दाखल होणारे सर्व गुन्हे, आरोपी यांसह सर्व कामकाजाची माहिती संगणकीय यंत्रणेत भरून ती जतन करण्यासाठी २०१५ पासून सीसीटीएनएस ही यंत्रणा देशपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या कामकाजासंदर्भात करण्यात आलेल्या मूल्यमापनात जुलै २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस प्रथम क्रमांकावर राहिले.
राज्यभरातील पोलिसांकडून चालणारे सीसीटीएनएस कामकाजाचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून दरमहा परीक्षण केले जाते. जुलै २०२३ या महिन्याच्या मूल्यमापनात नाशिक ग्रामीण पोलीस प्रथम क्रमांकावर राहिले. नाशिक ग्रामीण पोलीसांनी सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसऱ्यांदा मिळवला आहे.
हेही वाचा : नाशिक : गंगापूर धरणात प्रदूषण; जलपूजनास दशरथ पाटील यांचा विरोध
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सीसीटीएनएस शाखा कार्यरत असून या शाखेत काम करणाऱ्या सीमा उगलमुगले, ज्योती आहिरे, प्रतिभा शिंदे, कविता भोर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा अधीक्षक शहाजी उमाप यांनी गौरव केला.