नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या घाटमाथा क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने भाताची पेरणी अतिशय संथपणे पुढे सरकत आहे. आतापर्यंत केवळ २७.३१ टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस सुरगाणा, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत झाला आहे. मुळात घाटमाथ्यावरील या भागात दरवर्षी मुसळधार पाऊस होतो.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि मागील महिन्यात पाऊस पडल्यानंतर त्यात बराच खंड पडल्याने भाताची पेरणी अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात भाताचे ८७ हजार ४८८ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत २३ हजार ८९० हेक्टरवर म्हणजे २७.३१ टक्के पेरणी झालेली आहे. घाटमाथा क्षेत्रात अधिक्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी मुसळधार पाऊस लागतो. जूनमध्ये झालेल्या पावसात काहीअंशी पेरणी झाली होती. परंतु, नंतर पावसात खंड पडला. अलीकडेच उपरोक्त भागात तीन दिवस संततधार सुरू होती. यामुळे भाताच्या पेरणी क्षेत्रात सुमारे २० टक्के वाढ होऊ शकली परंतु, आजही बऱ्याच भागात मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.
हेही वाचा…नाशिक महापालिकेच्या जागेवर भ्रमणध्वनी मनोरे, भाडेतत्वावर देण्यासाठी १० जागा निश्चित
जिल्ह्यात ७६ टक्के पेरणी
जिल्ह्यात मुख्य पिकाखालील सहा लाख ५८ हजार ९१ सरासरी पेरणी क्षेत्र असून त्यातील पाच लाख एक हजार २३४ हेक्टर म्हणजे ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारी (२१ टक्के), बाजरी (५७ टक्के), नाचणी (१६), मका (१०९), इतर तृणधान्य (२५) . तूर (३४), मूग (११७):, उडीद (१७), इतर कडधान्ये (५४), कारळे (१.७१), सोयाबीन (१३०). इतर गळीत धान्य (१.३४), कापूस (६६) अशी पेरणी झालेली आहे.
© The Indian Express (P) Ltd