नाशिक : शहरात होणाऱ्या चोऱ्या, सोनसाखळी खेचणे, असे प्रकार पाहता सराफ व्यावसायिकांनी उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शस्त्र परवान्यांची व्यावसायिकांना माहिती द्यावी, सराफी दुकानदारांभोवती असलेले अतिक्रमण दूर करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करावा, दुकानांच्या वेळा वाढवून द्याव्यात, आदी विषयांवर नाशिक सराफ संघटना आणि नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्यातील बैठकीत सूचनांसह चर्चा करण्यात आली.

बैठकीत संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. कर्णिक यांनी, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सोनसाखळी चोरी, घरफोडी, दरोडा अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व दुकानदारांनी चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना केली. सराफी दुकानांभोवती होत असलेले अतिक्रमण दूर करण्यासाठी महानगरपालिकेशी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जाईल, असे सांगण्यात आले. दक्षता समिती स्थापन करणे, शस्त्रपरवान्यांविषयी सराफांना माहिती देणे, सराफ बाजारात वारसा कायदा आणि ना विक्रेता क्षेत्र नियमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, सराफी दुकानांची वेळ रात्री १० पर्यंत करावी, अशा मागण्या सराफ व्यावसायिकांच्या वतीने राजेंद्र दिंडोरकर यांनी आयुक्तांकडे केल्या.

आयुक्त कर्णिक यांनी सराफांना काही अडचणी असतील तर त्यासाठी थेट पोलिसांशी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले. शहर सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या दुकानांभोवतीचा परिसर, रस्ते दिसतीलस अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना केली.ॲानलाईन आर्थिक व्यवहार करताना होणारी फसवणूक रोखण्यासाठी लवकरच सायबर सेल पोलीस विभाग आणि सराफ व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे कर्णिक यांनी नमूद केले. यावेळी सराफ संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवासे, डॉ. राजेंद्र दिंडोरे यांच्यासह वाहतूक विभागाचे चंद्रकांत खांडवी ,वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल आदींसह सचिन वडनेरे, दिलीप चव्हाण, शितल बेदमुथा उपस्थित होते.

Story img Loader