नाशिक – महापालिका क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर खड्डे, उघडे ढापे, नाल्या असल्याने शहरातील सीबीएस ते शरणपूर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम पावसाळ्यात करण्यात येऊ नये, अशी मागणी नाशिक वाचवा समितीने केली आहे. पावसाळ्यात चिखल, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात. अनेक जण जखमी झाले आहेत. सीबीएसपासून पुढे शरणपूर रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरुस्ती सुरु आहे. या रस्त्याच्या कामामुळे एका बाजूच्या मार्गिकेवर दोन्ही बाजूचा ताण आला आहे. ही मार्गिका सुरक्षित नसून मोठ्या प्रमाणावर खड्डे व माती यामुळे तेथे वारंवार अपघात होत आहेत. यावर तातडीने उपाययोजना होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार
याविषयी नाशिक वाचवा समितीचे प्रमुख राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडुन महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन देण्यात आले. सीबीएसपासून दुरुस्ती करण्यात येत असलेला रस्ता नगररचना विभागाच्या नकाशाप्रमाणे करण्यात यावा, अतिक्रमण दूर करून कायमस्वरूपी रस्ता रुंद करण्यात यावा, त्यात कोणतीही तडजोड करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. कामाला विलंब होत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून शाळा, महाविद्यालय, बँका व प्रशासकीय इमारती यांची अधिक संख्या असलेल्या या मध्यवस्तीतील गजबजलेल्या परिसरात रस्ता कामामुळे वाहतुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण त्वरित करावे, खड्डेमुक्त नाशिक ही नाशिककरांची मागणी प्रत्यक्षात आणावी, पावसाळ्यात आहे तेच काम पूर्ण करण्यात येऊन नवीन कामाला सुरुवात करू नये, राजीव गांधी भवनसमोरील रस्ता त्वरीत खड्डामुक्त करण्यात यावा अन्यथा रहिवासी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर राजेंद्र बागूल, ज्ञानेश्वर काळे, कल्पना पांडे, विलास निकुंभ, कल्पेश जेजुरकर, वसंत मनियार आदींची स्वाक्षरी आहे.