नाशिक : उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असतांना तळपत्या उन्हात गर्दी जमविण्याचे आव्हान शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने पेलण्यात आल्याचे गोविंद नगरातील मनोहर गार्डनमध्ये आयोजित निर्धार शिबिरातून दिसून आले. शिबिरात येणाऱ्यांसाठी पक्षाच्या वतीने जणु पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. वातानुकूलित सभागृह, शुधाशांतीसाठी मिष्ठान्न तसेच नेत्यांची भाषणे सभागृहाबाहेरही ऐकता यावीत यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. शिबीरस्थळी अशी स्थिती असतांना शहरात ठिकठिकाणी मोठ्या आकारात शिबिरांचे लावण्यात आलेले फलक, पक्षाचे भगवे ध्वज, स्वागतासाठी लावण्यात आलेले फलक, यामुळे वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

मनोहर गार्डन परिसरात ठाकरे गटाच्या वतीने निर्धार शिबीर घेण्यात आले. वाढत्या तापमानामुळे पक्षाच्या वतीने वातानुकूलित व्यवस्था असलेले सभागृह शिबिरासाठी ठरविण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी काहींकडून वाहनव्यवस्था करण्यात आली. शिबिरासाठी येणाऱ्यांची नोंदणी करण्यात येत होती. पक्षाचे फलक, पक्षचिन्ह, उन्हापासून बचाव व्हावा यासाठी टोपी, असे साहित्याचे संच देण्यात आले. शिबीरस्थळी होणारी गर्दी पाहता सभागृहाबाहेर मंडप टाकत व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी बाहेर खुर्चीवर बसून सभागृहातील कार्यक्रम पडद्यावर पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यावर प्रवेशद्वारावर जेसीबीतून फुले उधळण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

दुसरीकडे, शहरात ठिकठिकाणी फलकबाजी करण्यात आली. चौकांमध्ये पक्षाच्या वतीने झेंडे लावण्यात आले. शिबिरासाठी आलेल्या नेत्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फलकबाजी करण्यात आली. शिबीरास येणाऱ्यांच्या शुधाशांतीसाठी खास मेजवानी ठेवण्यात आली. उद्घाटनसत्र आटोपल्यानंतर अनेकांची पाऊले भोजनस्थळाकडे वळली. बटाट्याची कोरडी भाजी, पोळी, उसळ, वरण-भात, सलाड, गुलाबजाम अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. अनेकांनी भोजनानंतर सावलीतच वामकुक्षी घेतली.