Nashik Kumbh Mela : गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्राम नगरी वसविण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी शासनाने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिकमध्ये २०२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या दृष्टीने सुमारे ४०० एकर क्षेत्रावर हे साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. हा परिसर ना विकास क्षेत्र असल्याने यातील ५४ एकर जागा महापालिकेने कायमस्वरूपी संपादित केली आहे. उर्वरित २६४ एकर जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली जाणार आहे. ही जमीन केवळ कुंभमेळ्याच्या एक वर्षासाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेतली जाते. तीच जागा हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) मोबदल्यात अधिग्रहित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आले.

हेही वाचा : कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा आज सादर; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक

कुंभमेळ्यात वर्षभरासाठी साधू-महंतांच्या निवासाकरिता तात्पुरते गाव साकारले जाते. यापूर्वी २०१५-१६मधील सिंहस्थाच्या वेळी ३२३ एकर क्षेत्रात साधुग्राम उभारण्यात आले होते. त्या वेळी तिथे तीन लाख साधू-महंत वास्तव्यास होते. आगामी कुंभमेळ्यात वैष्णवपंथीय तीन आखाडे आणि ११०० खालसा असे सुमारे चार लाख साधू-महंत वास्तव्यास राहण्याचा अंदाज आहे. त्र्यंबकेश्वरच्या शैवपंथीय आखाड्यांकडे स्वत:ची जागा आहे. नाशिकच्या प्रस्तावित साधुग्राममध्ये २३८६ भूखंड असतील. तेथे अंतर्गत रस्ते, तात्पुरते शौचालय, न्हाणीघर बांधणी, जलवाहिनी, विद्याुतीकरण, पोलीस चौकी, दवाखाने आदी कामे करण्यात येतील.

हेही वाचा : पाणी नियोजन बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस

रखडलेला प्रश्न मार्गी लागणार

साधुग्रामसाठी निश्चित जागेतील सुमारे पावणेतीनशे एकर जागा वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर घेतली जाते. यंदा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येऊन जागा अधिग्रहणाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे स्पष्ट केले. कुंभमेळ्याचा कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षे या जागेचा कसा वापर करता येईल, यावर महापालिका विचार करत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik simhastha kumbh mela 2027 sadhugram on 400 acres css